निकृष्ट जेवणावरील उत्तरेही मिळमिळीत
- सकाळ वृत्तसेवा
Monday, August 27, 2012 AT 12:22 AM (IST)
रिफेक्टरीत विद्यार्थी जेवण करीत असताना त्यांच्या भाजीत शनिवारी अळ्या आढळल्या होत्या. हा प्रकार रिफेक्टरी समिती अध्यक्षांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना अपशब्द वापरत हाकलून दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी जेवणावर बहिष्कार टाकला असून, "जेवण बंद' आंदोलन सुरू केले आहे. रविवारी रिफेक्टरी एकवेळ सुरू असते. मात्र, तेथे आज एकही विद्यार्थी फिरकला नाही. त्यामुळे रिफेक्टरीत शुकशुकाट होता.
""विद्यापीठात विविध समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागते. त्याची दखल घेतली जात नाही. निकृष्ट जेवणाची तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ढिसाळ कारभारामुळेच जेवणाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत गेला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे विद्यापीठाचे काम आहे.'' ""अडचणीबाबत तक्रार करण्यासाठी गेल्यास अधिकारी हाकलून देतात. "तुला काही समजते का? शिक्षण सोडून तुला हे धंदे सुचतात का?' अशा शब्दात खडसावतात. आम्ही अडचणी सांगायच्या कुणाला,'' असा प्रश्न एका विद्यार्थ्याने उपस्थित केला. निकृष्ट जेवणामुळे हॉटेलमध्ये जावे लागते. त्याचा खर्च पेलवत नसल्यामुळे अर्धवेळ काम करावे लागत आहे. जेवण चांगले मिळाले, तर अभ्यासाकडे अधिक लक्ष देता येईल, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
भोजनगृह सुरू करा
विद्यापीठाच्या 8 क्रमांकाच्या वसतिगृहातील भोजनगृह चार ते पाच महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. विद्यापीठाने तातडीने पावले उचलत हे भोजनगृह सुरू करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
विद्यापीठ आवारात "कचरानाट्य'
- सकाळ वृत्तसेवा
Monday, August 27, 2012 AT 12:15 AM (IST)
विद्यापीठातील शिवाजी पुतळ्याजवळील मोकळ्या जागेत एका ग्रुपतर्फे नारळपाण्याचे तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. मोकळ्या हवेचा आनंद घेतल्यानंतर त्या ग्रुपने खाद्यपदार्थ आणि नारळपाण्याचा मनमुराद आस्वाद घेतला. मात्र, याचा कचरा स्वतःसोबत न नेता तो पुतळ्यासमोरील मोकळ्या जागेतच टाकला अन् काही न घडल्यासारखे निघून जाण्याचा प्रयत्न केला. येथे फिरायला येणाऱ्यांपैकी काही सजग नागरिकांच्या मात्र ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी या ग्रुपला कचरा साफ करायला सांगितले; पण कचरा साफ करणे तर दूरच त्यांनी उलट उत्तरे देण्यास सुरवात केली. त्यामुळे वाद निर्माण झाला.
दरम्यान, नागरिकांनी पोलिस आणि विद्यापीठाच्या सुरक्षाव्यवस्थेशी संपर्क साधला. तसेच माजी सिनेट सदस्य ऍड. चिंतामणी घाटे, नगरसेवक राजू पवार, पुरुषोत्तम जाधवही यांनीही या ग्रुपला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नागरिकांच्या वाढत्या रोषाला सामोरे जाणे कठीण झाल्याने एक पाऊल मागे घेत या ग्रुपने सर्वांची माफी मागत येथील कचरा साफ केला. या प्रकारामुळे विद्यापीठ आवारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुतळा परिसरात खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास तसेच विद्यापीठ आवारात स्टॉलला परवानगी नसताना, असे प्रकार घडत असल्याने नागरिकांनी विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी नाराजी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment