मा. प्रा.डॉ .ई.व्ही.चिटणीस सरांनी सांगितलेल्या गोष्टीवर माझे असे मत आहे कि, त्या मुलीने जे केले ते योग्य आहे. ती ज्या समाजातून ज्या प्रदेशातून आहे, ज्याप्रकारे तिने मेहनतीने शिक्षण घेतलं, उच्चशिक्षित झाली. स्वतःच्या पायावर उभी राहिली. मोठ्या पगाराची नोकरी आहे. दुसऱ्या धर्माचा पती करून एक मुल दत्तक घेतलं. हे सर्व निर्णय तिने स्वतःच्या विवेक बुद्धीने, विचाराने घेतलेत तर यात वावगं काय ? तिच्या या निर्णयाने जर कोणाचे वाईट न होता जर काही चांगले होत असेल तर ते कौतुकास्पद आहे. तीने तिच्या कुटुंबाची, समाजाची योग्य रीतीने काळजी घ्यावी. त्यांना वेळोवेळी चांगली मदत, सहकार्य करावे, त्यांना प्रेम द्यावं. बस अजून बाकी काही जास्त अपेक्षित नाही. मग तीने धर्माबाहेर जाऊन लग्न करून इतरांना जो संदेश दिला जाईल तो समाजाच्या हिताचा आहे. मग आम्हाला व आमच्या काही धर्मांध राजकीय नेत्यांना ( अक्बरुद्दिन ओवेसी सारख्या ) निवडणुकीसाठीचे विषय हे विकासकामेच राहतील. त्यांना धर्माच्या नावावर लोकांना भडकवता येणार नाही. अश्या इतर चांगल्या घटना फक्त अश्या तिच्या सारख्या निर्णयांमुळे होतील. प्रत्येकाने तिच्यासारखी आपल्या विचारांची पार्श्वभूमी, आपला जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा. निरोगी समाज होण्यासाठी अश्या विचारांची आणि आचरणाची गरज आहे . अश्यानेच चांगल्या समाजाचे स्वास्थ टिकून राहू शकते.
काल दिनांक १८ जानेवारी २०१३ रोजी माझ्या मोठ्या चुलतभावाचा प्रेमविवाह झाला . सर्व जण अचानक होणाऱ्या या लग्नाला उपस्थित तर होतेच, त्या नवविवाहित जोडप्याला ( मनोभावे )शुभेच्छाहि दिल्या, पण त्याचबरोबर ते स्वतःच काहीश्या संभ्रमातहि होते, संभ्रम असा कि आपण उपस्थित आहोत ते लग्न तर आंतरजातीय आहेच, जातीचा प्रचंड ( नसलेला ) अभिमान आहे, पण त्याच जातीतल्या व्यक्तीशी आपले नाते तर चांगले आहे.म्हणून तर लग्नाला आलो.मग नंतर त्या विवाहाची विवाहमंडपात किंवा बाहेर त्याची नको असलेली चौकशी किंवा निंदा करायची,नको असणारे बिनबुडाचे प्रश्न करायचे, जातीचे खोटे दाखले द्यायचे.
एकीकडे त्या पांडुरंगाची वारी करायची, वारी करत असताना सोबत कोण आहे, कुठल्या जाती-धर्माचा किंवा समाज्याचा आहे हे पाहून थोडीच आपण वारी करतो किंवा त्याच्या सोबत विश्वासाच नात जोडतो. मग जात पात का मानायची,त्या संतांचे अभंग तर तोंडपाठ,त्यांची शिकवण तर मान्य, पण ती मात्र आमलात आणताना मात्र कुठेतरी कमीपणा का वाटून द्यायचा, हि कुठली परंपरा......त्याच पार्श्वभूमीवर माझ्या मनात एक काहूर माजलाय. प्रश्नांचे वादळ मनात घोंघावत आहेत. विचार खूप आहेत मनात, वाटत आपला समाज अजून त्याच मनःस्थितीत आहे. त्याच त्या जुनाट रूढी परंपरा, त्याच त्या चालीरिती......
पुन्हा एकदा त्याच संतांची शिकवण देण्यासाठी अजून संत जन्म घ्यावेत अस वाटू द्याव का ? त्यांची अगोदरच आजन्म पुरेल एवढी विचारांची शिदोरी दिलेली इतक्यात का संपावी ? का त्याच संतांच्या विचारांच्या त्यांच्या शिकवणींच्या नावाखाली आपले बुवाबाजीचे दुकान चालवायची, जे आताचे काही भोंदू बाबा, बुवा, बापू करतात, तेच करत राहायचं?? आजकालचे बापू नाही त्या विषयांवर बोलायला आणि कामे करायला लागले आहेत. वरती आपल्यालाच चुकीच्या गोष्टींच्या उपचाराचे डोस पाजायचे...
मग आपण आपल्या विचारांची पार्श्वभूमी केंव्हा वाढवायची ? का ??
काल केलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. त्यांच्या मते जोपर्यंत शाळेच्या दाखल्यावरून आपली जात जाणार नाही तोपर्यंत या समाजातून जात जाणार नाही..... मुळात आपण जातीची बीजे लहान मनांवरती का रुजवावी. जन्मलेल्या मुलाला काहीच माहित नसतं, आपणच त्याला शिकवतो ,सांगतो कि बाबा रे तू ह्या एका विशिष्ट जाती-धर्माचा आहेस. तू अस कर तू तस कर.मुळात आपणच आहोत या सर्व गोष्टीना जबाबदार..... शाळेत असताना प्रार्थना म्हणतो पण त्याची अंमलबजावणी मात्र आपण करत नाही. एकीकडे शाळेत सर्व धर्म समभाव हे शिक्षण द्यायचे आणि दुसरीकडे जातीयवादाला प्रोत्साहन द्यायचे हि कुठची पद्धत. कुठेतरी वाटत कि आपण शिक्षण घेतल्याने आपल्या विचारांमध्ये फरक पडतो, पण सारे कळून सुद्धा आपल्याला वळत नाही यासारखे ते दुर्भाग्य ते काय ???
समाजातून जात जाण्यासाठी काय करावं ?
जातिव्यवस्थेविषयीची तुमची मते काय आहेत ?
आंतरजातीय विवाह किंवा आंतरजातीय प्रेमविवाह करावा का ?
तुमची लाख मोलाची प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्वाची आहे.....